SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
खते, बियाणे व कीटकनाशकांची अनधिकृत
विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली तालुकास्तरावरील तालुका तक्रार निवारण समिती, तालुका स्तरावरील भरारी पथके तसेच जिल्हास्तरावरील भरारी पथके यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये कृषी सेवा केंद्र व्यतिरिक्त विनापरवाना कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील खते, बियाणे व कीटकनाशके या कृषी निविष्ठांच्या गुण नियंत्रण कामाचा आढावा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती, सांगली यांनी घेतला. सदरच्या सभेस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, मोहिम अधिकारी जिल्हा परिषद सांगली, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, मिरज, जत व विटा, तालुका कृषी अधिकारी, (सर्व), कृषी अधिकारी पंचायत समिती, (सर्व) असे एकूण जिल्ह्यातील ३२ गुण नियंत्रण निरीक्षक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी गुणनियंत्रण कामाविषयी मागील दोन वर्षाचा आढावा घेतला आणि मार्गदर्शन केले.
अधिकारी डॉ राजा दयानिधी म्हणाले, विना परवाना कृषी निविष्ठाची खरेदी न करणेबाबत शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणे, मेळावे घेणे, अवैध कृषी निविष्ठा खरेदी केल्यास होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून देण्यासाठी कृषी विभागाने विशेष पथके स्थापन करावीत. या विशेष पथकांचे सनियंत्रण उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
सांगली जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची नियमितपणे तपासणी करण्याच्या सूचना देऊन, पुढील पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ राजा दयानिधी यांनी दिले. कृषी सेवा केंद्रातून गुणवत्ता पूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांना देण्याबाबत व निविष्ठा देताना सर्व कायदेशीर बाबींचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगून गेल्या दोन वर्षांमध्ये तपासणी केलेल्या कृषी सेवा केंद्रामध्ये वारंवार अनियमीतता आढळणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे आदेशित केले.
सांगली जिल्ह्यात सर्व गुण नियंत्रण निरीक्षक यांनी बियाण्याचे ९९ टक्के, खताचे ९१ टक्के व कीटकनाशके यांचे ८४ टक्के इतके नमुने काढून विश्लेषणासाठी सादर केलेले होते, त्यामध्ये अप्रमाणित आलेल्या नमुन्याबाबत चालू वर्षी बियाणे २० खते १३ कीटकनाशके १ याप्रमाणे कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण- ८३ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद आदेश दिलेले असून २५ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द केलेला आहे. श्री. सुरेंद्र पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, सांगली यांनी विनापरवाना किटकनाशके विक्री करणाऱ्या इसमांवर बागणी, तालुका- वाळवा येथे १४ लाख ५० हजार इतके रकमेचे मुद्देमाल जप्त करून फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच मणेराजुरी येथे विनापरवाना खत उत्पादन करणाऱ्या दोन इसमांवर एफ. आय. आर. दाखल करून ४६ मेट्रिक टन खत सुमारे ८ लाख ५० हजारांचा साठा जप्त केलेला आहे. कृषी अधिकारी, पंचायत समिती संजय बुवा यांनी इस्लामपूर येथे विनापरवाना बियाणे विक्री करणाऱ्या इसमांवर एफ. आय. आर. दाखल करून सुमारे २३ लाख ५० हजार या किमतीचा सोयाबीन बियाणाचा १०.५७ मेट्रिक टन इतका साठा जप्त केला आहे. वाळवा येथे औद्योगिक कारणासाठी युरिया या खताचा वापर व साठा करणाऱ्या व्यक्तींवर एफ. आय. आर. दाखल केलेला आहे. कृषी विभागाच्या या कामाबद्दल जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी समाधान व्यक्त करून एवढ्याच कारवाईवर न थांबता अशाच पद्धतीने पुढील कामकाज करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांनी परवानाधारक दुकानातूनच बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते यांची खरेदी करावी व त्याचे पक्के बिल घ्यावे . तसेच विनापरवाना विक्री करणाऱ्यांकडून कृषी निविष्ठांची खरेदी करू नये असे आवाहनही डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये अवैधपणे विनापरवाना कृषी निवेष्ठांची विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ कृषी अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अथवा मोहीम अधिकारी यांना तात्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सांगली यांनीही केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत.
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________