सांगली वस्तुसंग्रहालय ; सांगली सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या शहरामध्ये त्या दर्जाला शोभेल असे उत्कृष्ट चित्रांचा संग्रह असलेले एक छोटेखानी संग्रहालय आहे.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली वस्तुसंग्रहालय ; सांगली सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या शहरामध्ये त्या दर्जाला शोभेल असे उत्कृष्ट चित्रांचा संग्रह असलेले एक छोटेखानी संग्रहालय आहे.




SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

                 सांगली वस्तुसंग्रहालय

सांगली सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या शहरामध्ये त्या दर्जाला शोभेल असे उत्कृष्ट चित्रांचा संग्रह असलेले एक छोटेखानी संग्रहालय आहे. सांगली संस्थानचे दिवंगत राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी रसिक आणि संग्रहाक वृत्तीने ज्या कलात्मक वस्तूंचा संग्रह केला त्याचा जनतेला आस्वाद घेता यावा या उद्देशाने  त्याचे रुपांतर राजवाड्याच्या इमारतीतील एका छोटेखानी संग्रहालयात करण्यात आले आहे.

 या संग्रहालयाचे उद्घाटन दि. 9 जानेवारी 1954 साली भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण्न यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थाने विलीन होण्याच्या काळात हे संग्रहालय अन्यत्र  एखाद्या शहरात हलविण्याचे घाटत होते. परंतु राजेसाहेबांच्या आग्रहाखातर सांगलीतील नागरीकांसाठी ते याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले आहे.


सांगली संग्रहालय आकारमानाने जरी लहान असले तरी त्यातील कलाकृती या नामांकित संग्रहालयाच्या तोडीच्या निश्चितच आहेत. सध्या अनेक प्रगत राष्ट्रामध्ये अशा तऱ्हेची संग्रहालये ही देशाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जतन करणारी व वृध्दिंगत करणारी संस्था म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.


सांगली संग्रहालयाचे वैशिष्ट्य  हे की, परदेशी कलाकार जेम्स वेल्स यांची तैलरंगातील उत्कृष्ट  चित्रे  या संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहेत. जेम्स वेल्स  या चित्रकाराने इ.स.1792 साली प्रेसिडेंट चार्ल्स मॅलेट यांच्या शिपारशीने भारतातील अनेक संस्थानिकांची चित्रे त्यांच्याकडे जावून चितारली होती.  त्यातील सवाई माधवराव पेशवे व नाना फडणवीस या इतिहासप्रसिध्द  व्यक्तिीची  त्याने चितारलेली मूळ चित्रे या संग्रहालयात पहावयास मिळतात. तर भारतीय चित्रकारापैकी रा. धुरंधर, व्ही.व्ही.साठे, गांगुली यांची चित्रे देखील या संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहेत. ए.एच.मुल्लर यांची रामायणातील प्रसंगावर आधारीत 15 तैलरंगचित्रे हा या संग्रहालयाचा अनमोल ठेवा आहे. ए.एच. मुल्लर  यांच्या एका चित्रास 1911 साली बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले होते ते चित्र राजकन्या ब्राम्हणाच्या  मुलास दान देताना या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेले आहे.


मुंबईचे प्रसिध्द शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांचे शबरीच्या वेषातील पार्वती हे एक वैशिष्टपूर्ण शिल्प  या संग्रहालयात प्रदर्शित केलेले आहे. या शिल्पाकृतीस दिल्ली येथील प्रदर्शनात 1902 साली लॉर्ड कर्झन यांचे हस्ते सुवर्णपदक प्राप्त  झालेले होते. महाराष्ट्रात जी काही उत्कृष्ट शिल्पे  आहेत त्यात या शिल्पाकृतीचा समावेश करावा लागेल. पुढे काही वर्षानंतर बळवंत गोविंद पोतदार यांनी पुन्हा हाच विषय घेवून शबरी लाकडामध्ये घडविली तिही या संग्रहालयात पहावयास मिळते.


संग्रहालयाकडे असणा-या वैशिष्टयपूर्ण वस्तुमध्ये इटली येथील पिसाच्या झुकत्या  मनो-याची मार्बल मधील प्रतिकृती, तसेच फत्तेपूरशिक्री या ठिकाणी असणाऱ्या सलीम चिस्ती यांच्या कबरीची मार्बल मधील प्रतिकृती, या प्रतिकृती असून देखील संबधित वास्तूच्या वेशिष्टयासह परीपूर्णतेने साकारण्यात आलेल्या आहेत.  जपानमधील गौतमबुध्दाचे सुवर्णमंदिर तसेच सांगलीच्या आयर्विन पुलाची लाकडी प्रतिकृती येथे पहावयास मिळते.

     या संग्रहालयाकडे असणा-या महत्वाच्या वस्तूमध्ये  ऐतिहासिकदृष्टया  महत्वाची वस्तू म्हणजे विजयनगरच्या कृष्णदेवरायाच्या ताम्रपट, हा ताम्रपट संस्थान काळात शिरहट्टी तालुक्यातील तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेल्या बिदरहळळी  या गावी एका शेतक-यास शेत नांगरताना सापडला. तेथून आणून तो येथे संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे.

     तंजावर शैलीतील मेणात बनविलेले एक चित्रही या संग्रहालयात आहे. बाळकृष्ण  असा त्याचा विषय , आज तिनशे वर्षे झाली पण काळाची पावले या चित्राकडे वळू शकलेली नाहीत. जी.पी.गांगोली असेच आणखी एक जातीचे कलाकार, त्यांचे धुक्यातील आगगाडी हे चित्र पाहताना कलाकराचे संवेदनशील मन जागृत होते. ए.एच.मुल्लर यांच्या गंगावतरण या चित्रात गंगा आणि तिला आपल्या जटेत घेणारा शंकर त्या देखाव्यात संकेतापुरतेच दाखविले आहे. यामुळे चित्रांचा विषय आणि त्यामागचा विचार मात्र खोल परिणाम साधून चित्र कायमचे लक्षात राहते.

      चित्राप्रमाणे शिल्पवैभवही अप्रतिम आहे. यामध्ये संग्रहालयाच्या दारातच रोमन संस्कृतीतील मक्युरीचा पुतळा, इजिप्शियन पृथ्वीदेवता इसिस, न्यायदेवता ओसोरीज, गायक मुसे, तत्ववेता सॉक्रेटिस, रशियन राजा पिटर द ग्रेट, शूर अलेक्झांडर, रोमनांचा राजा टोजन, जुलमी बादशहा निरो,  ज्युलियस सिझर, इजिप्तची राणी क्लिओपात्रा, रोमन युध्ददेव-देवता अशी अनेक महान व्यक्तिमत्वे  या प्लास्टरच्या  माध्यमातून आपली ओळख दाखवितात.

तसेच तांब्या पितळेची कलात्मक भांडी, हस्तीदंती चटई, उठावाची काष्ठशिल्पे , चंदनाच्या पेटया, लाकडी चौऱ्या, चंदनी पंखे, वेगवेगळ्या आकाराच्या व वैशिष्टयपूर्ण चिनीमातीच्या फुलदाण्या, पितळी बैलगाड्या, प्रतापगडावर सापडलेल्या कलात्मक दिव्याच्या माळा, चिंचोक्यावर कोरलेला वाघ व हत्ती, तसेच चिचोक्याच्या आकाराएवढ्या चंदनी लाकडामध्ये कोरलेला नंदी व गणपती या छोट्या कलाकृती देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

       संग्रहालय एस.टी. स्टॅन्डपासून 2 कि.मी. व रेल्वे स्टेशनपासून 6 कि.मी. अंतरावर आहे. संग्रहालयाचा दुरध्वनी व फॅक्स क्रमांक (0233) 2376913 हा असून ई-मेल आय. डी. sangali233museum@gmail.com हा आहे.

 संग्रहालयाची वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 पर्यत असून, प्रवेश शुल्क  रु. 10/- प्रौढासाठी व लहान 15 वर्षाच्या आत रु. 1/- तसेच महाविघालयीन  विघार्थ्यास रु. 5/-  तसेच विदेशी पर्यटक यांना रु. 100/- इतके आहे. संग्रहालय दर सोमवारी बंद असते.

- शं. धों. मुळे                                                                सहाय्यक अभिरक्षक                                                                सांगली वस्तुसंग्रहालय, सांगली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
______________________________________________

संपादकीय....

सांगलीचे पटवर्धन सरकार.... सांगलीची आत्मीयता... सांगलीचा अभिमान... समस्त सांगलीकरांच्या हृदयातले राजे... पटवर्धन हे नावच आदराचे दुसरे नाव आहे..... एखाद्याला आदराने बोलवायचे झाले तर "पटवर्धन राजे" ही एकच बिरुदावली योग्य आहे.....
अशा या पुरातन काळातील संस्थानिकांनी सांगलीमध्ये सांगली शहर वसवताना  सांगलीकरांच्यावर अतोनात उपकार केलेले आहेत ...ज्यावेळी संस्थाने खालसा झाली त्यावेळेला सांगलीकरांसाठी कलाकृतीचा उत्तम नमुना असलेले गणपतीचे मंदिर,राजवाडा व बांधकाम शैलीतील कोर्ट इमारत, दरबार हॉल, प्रतापसिंह उद्यान अमराई, अशा बऱ्याच वास्तू सांगलीकरासाठी  त्यांनी खुल्या केल्या आहेत  
आज जे सांगली शहरातील रस्ते आहेत ते देखील पटवर्धन सरकार यांचेच नावे आहेत....  सांगलीकरांना हे ज्ञात नसावे की आपण ज्या कोणत्याही रस्त्यावरून चालतो ती जागा पटवर्धन सरकारनी आपल्या प्रजेसाठी दिलेली आहे.... आज देखील एखादा सातबाराचा उतारा  पाहिल्यास गणपती संस्थान याचाच नामोल्लेख आढळतो...
जरी संस्थाने  खालसा झाली असली तरी या संस्थानांमधून सांगलीकरांच्यासाठी सर्व जाती धर्मासाठी पटवर्धन संस्थानाने कोणताही जातीभेद न करता सर्व धर्मांना समसमान न्यायाने त्यांना मदत केलेली आहे... त्यामुळेच सर्व सांगलीकरांच्या हृदयात पटवर्धन सरकार हे नाव कोरलेल आहे ....

त्यामधील एक भाग म्हणजे म्युझियमचा आहे .. ऐतिहासिक पुरातन काळातील वारसा असलेले हे म्युझियम सांगलीकरांच्या पासून दुर्लक्षित आहे .. याचं प्रमुख कारण म्हणजे याची माहिती याचा प्रचार आणि प्रसार सांगलीकरांच्या किंवा जनतेपर्यंत झालेला नाही  ...जुन्या पिढीतील काही लोकांना हे संग्रालय माहिती आहे, परंतु हे असं ऐतिहासिक हजारो वर्षाचं ठेवा असलेला म्युझियम आज तरी नव्या पिढीस  माहित नाही,....  
  या म्युझियमच्या दुरावस्थेला येथील  मॅनेजमेंट जबाबदार असल्याचे समजून येत आहे...

 मध्यंतरी काळात या  म्युझियम मधील काही वस्तू  चोरीस गेल्याचे समजून आले होते... तरी पटवर्धन सरकार कुटुंबीयांनी या म्युझियमकडे लक्ष देणे गरजेचे आहे... 

 या म्युझियमची जाहिरात करण्यासाठी सांगलीतील मोठ्या बँका, उद्योगपती आणि सांगली व सांगलीकरांच्या ऐतिहासिक ठेव्या बाबतीत आत्मीयता बाळगणाऱ्या सर्व लोकांनी आपल्या जाहिरातीमधून या म्युझियमचा प्रचार आणि प्रसार केल्यास हा अमूल्य ठेवा... पर्यटकांना व भावी पिढीस बघण्याचा आनंद आपण सांगलीकर देऊ शकतो ..

असो ...

सलीम नदाफ, संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड.
8830247886
______________________________________________