SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठीसंपूर्ण सांगली जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोगासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित
- जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी
सांगली, दि. 14, : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व चिकुर्डे या गावांमधील अनुक्रमे चार लम्पी चर्मरोग सदृश्य बाधित संकरीत गायी व एका लम्पी चर्मरोग सदृश्य बाधित संकरीत गायीमधील रक्त नाकातील स्त्रावाचे swabs व अंगावरील नोड्यूलचे scrapping नमुने प्रयोगशाळेतून लम्पी चर्म रोगासाठी होकारार्थी आले आहेत. जिल्ह्यात उद्भवलेल्या गो व महिष वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी संपूर्ण सांगली जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोगासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गावात किंवा अन्य साहित्य आणि अशा बाधित प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.
गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडण्यास मनाई करण्यात आली आहे. नियंत्रित क्षेत्रातील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्ह्यातील ज्या भागातील पशुपालकांच्या गो जातीय व म्हैस जातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष होकारार्थी येथील अथवा बाह्य लक्षणांवरून रोगाचे निदान झाल्याची खात्री झाल्यास अशा ठिकाणापासून ५ कि.मी. त्रिज्येच्या परीघामधील सर्व संक्रमित न झालेल्या जनावरांचे रिंग पद्धतीने लसीकरण करून रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सांगली (मु. मिरज) व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली या विभागांनी कराव्यात.
या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करावी. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली