SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू
सांगली : राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 59 तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत गो व म्हैस वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व चिकुर्डे या गावांमधील अनुक्रमे 4 लम्पी चर्मरोग सदृश्य बाधित संकरीत गायी व एका लम्पी चर्मरोग सदृश्य बाधित संकरीत गायीमधील रक्त नाकातील स्त्रावाचे स्वॅब व अंगावरील नोड्यूलचे स्क्रॅपिंग नमुने प्रयोगशाळेतून लम्पी चर्म रोगासाठी होकारार्थी आले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गो व म्हैस वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुढीलप्रमाणे मनाई आदेश पारित केला आहे.
शेतकरी / गोपालक यांना बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची / जनावरांची वाहतूक करण्यास मनाई केली आहे. सांगली जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यांमध्येही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्याने जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्येही जनावरांची खरेदी- विक्री व प्रदर्शन होत असल्यास, त्यालाही मनाई केली आहे. तसेच बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करावी. हा आदेश दि. 12 सप्टेंबर 2022 रोजीचे 00:01 वाजल्यापासून ते दि. 11 ऑक्टोंबर 2022 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली