MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
नारायण राणेंना मोठा झटका.... 'अधीश' बंगल्यातील बांधकाम बेकायदाच; अनधिकृत बांधकाम तोडण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण त्यांच्या मुंबईतील ' अधीश' बंगल्यातील बांधकाम बेकायदा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातील बांधकाम पाडण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. याप्रकरणी राणेंना उच्च न्यायालयाने १० लाखांचा दंड ठोठावला आहे.
एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा ठपका नारायण राणेंवर ठेवण्यात आला आहे. या बंगल्यात बेकायदा बांधकामासाठी करण्यात आलेला अर्ज महापालिका विचारात घेऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुंबईतील जुहूमध्ये समुद्र किनाऱ्यालगत हा बंगला आहे.
संतोष दौंडकर यांनी या बंगल्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणेंना नोटीसदेखील बजावली होती. या बंगल्याची पाहणी महापालिकेच्या पथकाकडून करण्यात आली होती. त्यावेळी
भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, बंगल्यातील बांधकाम नियमित करण्यासाठी दाखल केलेला पहिला अर्ज फेटाळल्यानंतरही त्याच मागणीच्या दुसऱ्या अर्जाला विरोध न करण्याच्या मुंबई महापालिकेच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी संताप व्यक्त केला होता. पालिकेने यापूर्वी हे बांधकाम बेकायदा ठरवून ते नियमित करण्यास नकार दिला होता.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली