MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी; राज ठाकरेंचा हल्लाबोल
सध्या राज्यात गाजत असलेल्या फॉस्ककॉन प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. फॉस्ककॉन प्रकरणाची चौकशी व्हावी असंही राज ठाकरे म्हणाले. राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल करत नेमकं कुठं फिस्कटलं याची चौकशी व्हावी, असं राज ठाकरे म्हणाले. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी असं ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, राजकारण वैयक्तिक नसतं, वैचारिक धोरणांवर मी टीका करतो. माझा काय धोरणांना विरोध होता. पंतप्रधान मोदींवरही वैयक्तिक टीका केली नाही, त्यांच्या धोरणांवर टीका केली, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. मनसेने मविआ सरकारचं कधीच कौतुक केलं नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असंही ते म्हणाले.
युतीच्या काळात भाजपनं कधीच मुख्यमंत्री पदाची मागणी केली नाही
भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळात भाजपनं कधीच मुख्यमंत्री पदाची मागणी केली नाही. त्यावेळी 1989 साली ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ठरले होते, मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता मात्र मतदान होतं, निकाल लागतो आणि नंतर वाट्टेल त्या प्रकारे निर्णय घेतले जातात. पंतप्रधान मोदी, अमित शाह हे प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं बोलत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. हा मतदारांचा अपमान आहे. या सगळ्या गोष्टी मतदारांसमोर येणं आवश्यक आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा
नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही सांगितले. राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर 16 वर्षे झाली तरी विदर्भात पक्षाचं अस्तित्व नाही. ज्या गतीने पक्ष विस्तार व्हायला हवा होता, तसा विस्तार झाला नाही. विदर्भात अनेक तरुण-तरुणी मनसेत काम करण्यास इच्छुक आहेत. त्यांना संधी देण्यात येईल, असं राज ठाकरे म्हणाले. नागपूर महानगरपालिकेत अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे. प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याशिवाय मोठं होता येत नाही. त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध लढू आणि पक्षाला नक्कीच नागपूरकर साथ देतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली