KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे
इचलकरंजी फेस्टिवल अंर्तगत झिम्मा-फुगडी स्पर्धेत अष्टभुजा महिला मंडळ प्रथम...
झिम्मा-फुगडीने धरलेले रिंगण अन् फु बाई फुऽऽ चा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटूनथटून, कोल्हापुरी साज-नथ-बिंदी अशा आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला झिम्मा-फुगडी, काटवटकणा, उखाणे, छुई-फुई, घागर घुमविणे, सूप नाचविणे अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये दंग झाल्या होत्या. निमित्त होते ते इचलकरंजी फेस्टिवल 2022 चे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे नव्याने दर्शन घडले.
इचलकरंजी फेस्टिवल अंतर्गत मंगळवारी पारंपरिक वेशभूषेमुुळे खुलून दिसणारा मराठमोळ्या सौंदर्याचा थाट, पारंपरिक गीतांच्या तालावर धरलेला फेर अन् प्रोत्साहनासाठी होणारा टाळ्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात महिलांच्या झिम्मा-फुगडीचा खेळ रंगला होता. या स्पर्धेचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे तसेच फेरीवाले व फळविक्रेता संघटनेचे अध्यक्ष शफिक बागवान व पदाधिकार्यांच्या हस्ते महाआरती करुन करण्यात आला.
प्रारंभी इचलकरंजी फेस्टिवलच्या संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांनी स्वागत करत प्रास्ताविकात भारतीय संस्कृती जपण्याबरोबरच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आल्याचे सांगितले. या झिम्मा-फुगडी स्पर्धेत सहभागी 20 महिला गटांनी अत्यंत उत्कृष्ठपणे आपली कला सादर केली. या स्पर्धेमध्ये अष्टभुजा महिला मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. तर जय हनुमान महिला मंडळाने द्वितीय आणि हरिप्रिया महिला मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.
यावेळी वीरशैव लिंगराज मंडळमधील लहान मुलींनी मंगळागौरीचे विविध खेळ सादर केले. त्यांच्या या अविष्काराबद्दल सौ. मोश्मी आवाडे यांनी या मंडळाला पाच हजार रुपयांचे विशेष बक्षिस देऊन गौरविले. तर आज काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये गायत्री कार्वेकर या पैठणी च्या आणि सानिका पुजारी या 10 ग्रॅम चांदीचे नाण्याच्या मानकरी ठरल्या. यावेळी सौ. अंजली बावणे यांनी सुरेख सूत्रसंचालन व निवेदन करत कार्यक्रमात आणखीन रंगत आणली.
याप्रसंगी फेस्टिवलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर, सचिव शेखर शहा, इंदिरा महिला सूत गिरणीच्या व्हा. चेअरमन संगिता नरंदे, सौ. शुभांगी शिंत्रे, सौ. गिरीजा हेरवाडे, सौ. मेघा भाटले, नजमा शेख, सौ. ललिता पुजारी, सोनाली तारदाळे, तात्यासाहेब कुंभोजे, राहुल घाट आदींसह फेरीवाला फळविक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष अयान बागवान, सचिव निहाल बागवान, इजाज मुल्ला, राहुल आवटे, सोहेल बागवान, तोसिफ बागवान उपस्थित होते.
दरम्यान, सोमवारी सायंकाळच्या सत्रात झालेल्या संगीतावर आधारीत सप्तसुर प्रस्तुत कराओके या जुन्या हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची चांगलीच दाद मिळविली. कांचनमाला, जुगल तिवारी, राजेंद्र आसोळे, बाळासाहेब देवनाळ, संतोष कोष्टी, प्रभाकर लोहार, निखिल आसोळे, प्रियंका मिरजकर आदी कलाकारांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांना खिळवून ठेवले होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली