SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
ग्राहकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्यासाठी अन्न व्यवसायीकांना खबरदारी घेण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना
सांगली, दि. 30, : ग्राहकांना येत्या सणासुदीच्या गणपती उत्सव, दसरा, दिवाळी व नाताळ काळात सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने अन्न व्यवसायीकांना खबरदारी घेण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे दिल्या आहेत.
अन्न व्यवसायीकांनी मिठाईच्या ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा. कच्चे अन्नपदार्थ जसे दुध, खवा, खाद्यतेल व वनस्पती इत्यादी हे परवानधारक व नोंदणीधारक व्यवसायीकाकडूनच खरेदी करावेत व त्यांची खरेदी बिले जतन करावी. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत.
त्वचा व संसर्गजन्य रोगांपासून कामगार मुक्त रहावेत यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी वेळोवेळी करावी. मिठाई तयार करताना केवळ फुड ग्रेड खाद्यरंगाचाच मर्यादीत प्रमाणात वापर करावा. दुग्धजन्य पदार्थांच्या मिठाईचे सेवन त्वरीत करण्याबाबत आस्थापनेत निर्देश ठळक ठिकाणी लावावेत. माशांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेत. अन्नपदार्थ तयार करताना वारण्यात येणारे खाद्यतेल 2 ते 3 वेळाच तळण्यासाठी वापरण्यात यावे.
वापरलेले खाद्यतेल RUCO अंतर्गत नेमण्यात आलेल्या ॲग्रीग्रेटर यांना देण्यात यावे. स्पेशल बर्फी सारख्या पदार्थाचा वापर खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणून करू नये. विक्रेत्यांनी विक्री बिलावर त्यांच्याकडील FSSAI क्रमांक नमूद करावा. विक्रेत्यांनी दुध व दुग्धजन्यपदार्थ, खवा, मावा यासारख्या नाशवंत पदार्थाची वाहतूक ही योग्य तापमानास व सुरक्षितरित्या करावी. परवाना किंवा नोंदणी न घेता अन्नपदार्थांचा व्यवसाय करू नये, अशा सूचना सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिल्या आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली