SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 'माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार' या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे :
सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 'माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार' या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरून आपल्या देखावा-सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांनी व घरगुती स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरीरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात. तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीव्दारे सामाजिक संदेश देखील दिले जातात. याच धर्तीवर माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफीत हे साहित्य पाठवायचे आहे.
मताधिकार हा 18 वर्षावरील नागरीकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतल दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर आपल्या देखावा-सजावटीतून जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://ceo.maharashtra.gov.in/) आणि समाजमाध्यमांवर या स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली