SANGLI:
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सांगली
पूरपरिस्थिती आली तरी घाबरू नका
शासन, प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील
- संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांची तयारी समाधानकारक
- शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोबाईल सुरू ठेवावेत
मंत्री डॉ.सुरेश खाडे
सांगली दि. १४ : सद्यस्थितीमध्ये पूर परिस्थिती नाही तथापी पूर आल्यास जनतेला कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्व यंत्रणा राबण्यासाठी सज्ज आहे. तसेच आपत्ती काळात सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल सुरू ठेवावेत, रजेवर जावू नये, रजेवर असल्यास आवश्यकतेनुसार कर्तव्यावर तातडीने हजर व्हावे, असे निर्देश मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा आढावा घेतला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, गणेश मरकड, संपत खिलारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पूरग्रस्त भागातील जनतेने आता घाबरून जावू नये. पूर आल्यास जनतेला कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्व यंत्रणा आपआपल्या जबाबदाऱ्या योग्य समन्वयाने पार पाडतील. आता धरणे भरली आहेत. अतिवृष्टी झाली तरच पूरपरिस्थिती निर्माण होईल. पूरपरिस्थितीसाठी आवश्यक असणारा निधी शासन स्तरावरून तातडीने आणला जाईल. जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पूरामुळे नुकसान झालेले आहे त्याच्या सुधारणांसाठी तयार करण्यात आलेले प्रस्ताव, निधीसाठी केलेली मागणी याबाबतचेही प्रस्ताव तातडीने शासन स्तरावर पाठवून त्यातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी पूरप्रवण क्षेत्रातील प्रत्येक गावात बोटी उपलब्ध करून देण्यात याव्यात. एकही गाव बोटीविना राहू नये याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
यावेळी खासदार संजय पाटील यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी समन्वयाने काम करावे, असे सांगून त्यांनी तालुकानिहाय कामांचा आढावा यावेळी घेतला.
यावेळी पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. कोयना धरणावर जलसंपदा विभागामार्फत सर्कल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सांगून त्यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे सांगितले. तसेच विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले असून संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे सांगितले. तसेच जनतेसाठी पावसाची व धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन या विभागांनी सद्यस्थितीत करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.
प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीची माहिती सांगून संभाव्य पूर परिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या सेल्फी पाँइटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाजन विभिषीका प्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली