लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
कामाची वेळ व दर्जाला महत्व देवून कामकाज करा....
- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन उत्स्फूर्तपणे साजरा
सांगली दि. 1 : महसूल यंत्रणा ही ब्रिटीश कालावधीपासून चालत आलेली यंत्रणा असून या यंत्रणेचे त्यावेळचे कामकाज जमिनीबातचा महसूल एकत्रित करण्याचे होते. त्याचबरोबर त्याचे रेकॉर्ड ठेवणे, मोजणी करणे ही कामे केली जात असे. सद्यस्थितीत या कामांबरोबरच काळानुरूप अनेक कामे वाढली आहेत. या माध्यमातून जनतेची कल्याणकारी कामे होत आहेत. महसूल यंत्रणेत प्रत्येक काम करताना त्याचे व्यवस्थित प्रस्ताव तयार करावेत. हेच आपल्या कामाचे कार्यमुल्यन आहे. आपल्या कामावरूनच आपल्या कामाचे मुल्य ठरते. आपण उत्कृष्ट आहोत यावरूनच सिध्द होते. त्यामुळे प्रत्येक काम करताना प्रामाणिक व मुद्देसुदपणे करावे. कोणतेही काम करत असताना कामाची वेळ, कामाचा दर्जा याला महत्व देवून कामकाज करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले बर्डे, विटा उपविभागीय अधिकारी संतोष भोर, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, सचिन बारवकर, डॉ. निलीमा लिमये यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, महसूल यंत्रणाही सर्वात महत्वाची यंत्रणा आहे. तुम्ही जे काम करत आहात त्याची सविस्तर नोंद ठेवून त्याचे एक दस्तावेज तयार करावे. यावर जास्त भर द्यावा. शासन निर्णयाचे सविस्तर वाचन करून चांगले प्रस्ताव तयार करावेत. काम करण्यासाठी शासन आपणास मार्गदर्शन मिळावे तसेच अपेक्षित काय हवे आहे यासाठी शासन निर्णय काढत असते. त्याचे चिकित्सकपणे निरीक्षण करावे व त्यानुसार कामकाज करावे. कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करण्यापेक्षा ते कमी वेळेत अचूकपणे जास्त काम करणे यावर भर दिला पाहिजे. स्मार्ट कामकाज अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगली प्रतिमा निर्माण करू शकते. काम करताना चुकीच्या गोष्टींना नेहमी टाळले पाहिजे. तसेच आपण जे काम करतो ते सकारात्मक पध्दतीने करून मानसिक ताणतणाव न घेता योग्य पध्दतीने पार पाडणे हेच खरे कामकाजाचे स्वरूप आहे. यामुळेच जनतेचीही कामे योग्य वेळेत होवून त्यांना न्याय देता येईल. त्याचबरोबर आपण आनंदाने आपल्या कुटुंबालाही योग्य वेळ देवू शकू. कोणतेही काम असो ते आनंदाने करतच येणारा प्रत्येक क्षण जगून काम करावे. उद्याच्या आनंदासाठी आजची अमुल्य वेळ आपण गमवू नये. आजचा दिवस आनंदानेच जगा, त्या दृष्टीनेच काम करा तरच आपले जीवन सुखी आणि समृध्द होईल, असे सांगून त्यांनी महसूलदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. निलीमा लिमये यांनी जादू सकारात्मकतेची या विषयावर मार्गदर्शन केले. अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले बर्डे, विटा उपविभागीय अधिकारी संतोष भोर, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार किशोर घाडगे, संघटना पदाधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मंडळ अधिकारी रूक्साना तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन मंडळ अधिकारी रूक्साना तांबोळी व कोतवाल सुधीर गोंधळी यांनी केले. आभार महसूल सहायक उज्वला यादव यांनी मानले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली