RAYGAD:
लोकसंदेश प्रतिनिधी शाम लोखंडे
मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
अवघ्या पाच दिवसांवर कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सव आला आहे. प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. परंतु ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणवासी बाप्पाला घेऊन गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जात असतात त्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते.
मात्र पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्थेने पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनाने प्रशासनाला जाग आली असून मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर येथील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.
काही वर्ष दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची व्यथा, वनवास काही केल्या संपत नाही. दरम्यान दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो. कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणामार्फत हे खड्डे तातडीने बुजवणं गरजेचं होतं. मात्र कासू ते इंदापूर हा 42 किलोमीटरचा रस्ता उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ असल्यामुळे हे काम बरेच महिने रखडले गेले.
डागडुजीसाठी ठेकेदारांची नियुक्ती
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पळस्पे ते इंदापूर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे आदेश दिले असून यासाठी मे.रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका, मे.जे.एम.म्हात्रे, मे.के.एन.घरत, मे.व्ही.एस.पाटील, मे.झेनिथ कन्स्ट्रक्शन या पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. रस्त्यावर डांबर, खडी, सिमेंटकाँक्रीट टाकून हे खड्डे बुजवले जाणार आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली