पुणे विभागात 50 लाख घरावर फडकणार तिरंगा
....विभागीय आयुक्त सौरभ राव.
PUNE
लोकसंदेश नेटवर्क पुणे
पुणे, दि. 8 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील सुमारे 50 लाख घरांवर तिरंगा फडकविला जाणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपायुक्त (विकास) विजय मुळीक, उपसंचालक माहिती डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, सहायक आयुक्त डॉ. सीमा जगताप, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे डॉ. किरण मोघे उपस्थित होते.
श्री. राव पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कामाची जाणीव पुढील पिढीला होण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. या अभियानात विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यत सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे असे श्री. राव यांनी सांगितले. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एका ठिकाणी 75 फूट झेंडा फडकविला जाण्याचे नियोजन आहे.
यात पुणे शहरात शनिवार वाडा व शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राऊंडमध्ये हा झेंडा फडकविला जाईल. त्याचप्रमाणे विभागात सर्वत्र वातावरण निर्मितीसाठी देशभक्तीपर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये पथनाट्य, लघूपट, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, साहसी खेळ, मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन, रांगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला, प्रभात फेऱ्या आदी कार्यक्रमांचा समावेश आहे, असेही श्री. राव यांनी सांगितले.
पुणे विभागात 50 लाख घरांवर तिरंगा
पुणे विभागात ग्रामीण भागातून 29 लाख 98 हजार 142 तर शहरी भागातून 19 लाख 65 हजार 669 असे एकूण 49 लाख 63 हजार 811 राष्ट्रध्वजाची मागणी आहे. त्यापैकी 40 लाख 72 हजार 811 राष्ट्रध्वज उपलब्ध आहेत. तसेच उर्वरीत आवश्यक असलेल्या 13 लाख 1 हजार तिरंगा ध्वजापैकी 10 लाख 96 हजार ध्वज केंद्र शासनाकडून उपलब्ध झाले आहेत. विभागातील संबंधीत जिल्ह्यांच्या मागणीनुसार राष्ट्रध्वजाचे वितरण देखील करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्याला 20 लाख 88 हजार 555, सातारा जिल्ह्याला 6 लाख 97 हजार 75, सांगली जिल्ह्याला 6 लाख 3 हजार 632, सोलापूर जिल्ह्याला 5 लाख 86 हजार 645 तर कोल्हापूर जिल्ह्याला 8 लाख 42 हजार 904 असे एकूण 51 लाख 68 हजार 811 राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
तिरंगा दूत
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून इयत्ता 8 वीच्या पुढील विद्यार्थ्यांना तिरंगादूत म्हणून प्रशिक्षण दिले आहे.त्यांच्यामार्फत राष्ट्रध्वज फडकवण्याबाबत जनजागृती तसेच कुटुंबांपर्यंत भारतीय ध्वजसंहितेचे नियम पोहोचविण्यात येत आहेत.
महानगरपालिका व नगरपालिका बहुतांश ठिकाणी त्यांच्या स्वनिधीतून विहित मार्गाने तिरंगा खरेदी केली जात आहे. घंटागाडीमधून जिंगल्सद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद सीएसआरच्या माध्यमातून पेट्रोलपंपधारक, रेशन दुकानदार, बँका, शासकीय कंत्राटदार, स्वयंसेवी संस्था, कर्मचारी संघटना, कर्मचारी पतसंस्था, बचतगट, सहकारी संस्था,सहकारी दूध संघ इत्यादी मार्फत डोनेशन स्वरुपात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांना वॉर्डनिहाय जबाबदारी देऊन नागरिकांमध्ये प्रचार प्रसिध्दी करुन प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवला जाईल याची काळजी घेण्यात येत आहे.चित्रपटागृहात चित्रफीत व जिंगल्स दाखविण्यात येत आहेत. रेडिओ, स्थानिक वृत्तपत्र, स्थानिक केबल, एनजीओ, समाजमाध्यमाद्वारे प्रचार जनजागृती करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रध्वजांचे वाटप व संकलन ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा स्वंयसेविका, इयत्ता 8 वी च्या वरील एनसीसी विद्यार्थी यांच्यामार्फत नियोजन करण्यात आले आहे.
पुणे विभागातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ हा अभियानात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सहभाग घ्यावा. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली