MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
शिंदे-फडणवीस सरकार येताच अमित शाह सक्रिय, ५ सप्टेंबरला मुंबई दौरा, राजकीय हालचालींना वेग.....
मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून शिंदे-फडणवीसांची सत्ता आल्यानंतर भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्याची सत्ता मिळाल्यानंतर आता शिवसेनेला पूर्णपणे संपवण्यासाठी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप पक्ष आक्रमकपणे कामाला लागला आहे. मुंबई महानगरपालिकेची ही लढाई लढण्यासाठी अमित शाह जातीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमित शाह गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत एक दौरा करणार आहेत. अमित शाह हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येतील. यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अमित शाह आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर आपल्या दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे अमित शाह हे मुंबईतील प्रसिद्ध लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
अमित शाह २०१७ साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला न चुकता येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार आहेत. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा गणेशोत्सवाच्या काळातील गणपती दौरा हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे अमित शाह यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हेदेखील मुंबईत येणार आहेत.
१५ आणि १६ डिसेंबरला जे.पी. नड्डा यांचा मुंबई दौरा असेल. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अमित शाह हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. काही दिवसांपूर्वी अमित शाह नाशिक दौऱ्यावर येणार होते. परंतु, त्याचवेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे आता अमित शाह मुंबई दौऱ्यात नेमकं काय करणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई