पनामा कालवा वाहतुकीचा जगातील उत्तम नमुना पनामा कॅनॉल म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांमधील खाडी मध्ये असणारा कॅनॉल. ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पनामा कालवा वाहतुकीचा जगातील उत्तम नमुना पनामा कॅनॉल म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांमधील खाडी मध्ये असणारा कॅनॉल. ...




पनामा कालवा जगातील जहाज वाहतुकीचा
उत्तम नमुना.....
पनामा कॅनॉल म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांमधील खाडी मध्ये असणारा कॅनॉल. ...

खरंतर हे दोन्ही खंड हे जमीनीच्या अगदी चिंचोळ्या अश्या डोंगर पट्टीने व्यापलेली होतीत, आजही आहे. या दोन्ही खंडांच्या पूर्वेकडुन त्यांच्या पश्चिम किनारपट्टी कडे जलमार्गे जायचे म्हंटले तर पूर्ण दक्षिण अमेरिकेला वळसा घालण्या शिवाय पर्यायच नव्हता. हे अंतर अधिकाधिक पकडले तर जवळपास 15000 किलोमीटर होतय.... हो बरोबर वाचलेत पंधरा हजार किलोमीटरच. अगदी नगण्य म्हटलं तरी 2000 किलोमीटर चा फरक पडतोच पडतो.



ही अडचण सर्वप्रथम स्पेन चा राज्यकर्ता चार्ल्स (प्रथम) याने 16 व्या शतकात ओळखली. पण मूळ अडचण म्हणजे जो या दोन्ही अमेरिका खंडांना जोडणारा सर्वात चिंचोळा भाग होता तो डोंगर दऱ्या आणि दुर्गम जंगलाने व्यापलेला होता. आणि हे सर्व काम करणे म्हणजे याला लागणारा अमाप वेळ आणि पैसा हे उपलब्ध करणे अशक्य वाटले आणि तो विचार प्रत्यक्षात हाती घेतला गेला नाही.


पुढे कांही शतकांच्या अंतरानंतर म्हणजेच 1882 सालाच्या वेळेस हे काम पुन्हा एकदा फ्रांस ने चालू करायचे ठरवले आणि काम सुरू केले.  त्याच्या कांहीच वर्षे आधी सुएझ कॅनॉल तयार केला गेला होता आणि त्या कामाचा फ्रांस च्या इंजिनीअरना अनुभव आला होताच. त्यांनी यावर काम चालू केले आणि खालील गोष्टी निदर्शनास आल्या.




एकतर ज्या जागेतून कॅनॉल काढायचा आहे तो भाग म्हणजे दुर्गम असे जंगल तर आहेच त्यात भरीस भर म्हणजे पूर्णतः डोंगर आणि दऱ्यांचा भाग आहे. अश्या भागामुळे लोकवस्ती असणे तर अगदी दुरापास्त. त्यांनी तरीही धाडस केले आणि काम चालू केले. पण या जंगलात जसे कामगार घुसले तसे त्यांना यलो फिवर आणि मलेरिया या रोगांनी गाठले आणि या साथीच्या रोगाने शेकडो कामगार लोक मरून गेले. मग कामात शिथिलता आली आणि शेवटी संथ गती, घटत जाणारे मनुष्यबळ आणि अपुरा पैसा यामुळे फ्रान्सच्या लोकांनीही हे काम अर्धवट सोडून दिले.

                शेवटी काम चालू झालेच...




1902 साली तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी या कामात लक्ष घालायचे ठरवले आणि त्यांनी फ्रांस कडून हा प्रोजेक्ट विकत घेतला. पण कोलंबिया स्टेट अमेरिकेच्या विरोधात होती. याच काळात पनामा देश स्वातंत्र्यासाठी झगडत होता. याकामी अमेरिकेने कोलंबियाचा विरोध डावलून  पनामा देशाला मदत देऊ केली पण त्याबदल्यात पनामा कॅनॉल चे हक्क मागून घेतले आणि ते त्यांनी अगदीच आढेवेढे न घेता देऊन ही टाकले. आणि त्यांनी काम हाती घेतले.
आता खरी परीक्षा होती या कॅनॉल च्या खोदकामाची, कारण मध्ये मध्ये असणारे प्रचंड उंची असणारे डोंगर आणि दऱ्या. याकामी रुजवेल्ट यांनी जॉन स्टीवन्स या इंजिनीअरला या कामाचा इंचार्ज बनवले आणि त्याच्याहाती हे काम सोपवले.
त्याने सर्व बाजूनी सखोल विचार करून एक अफाट आणि अविश्वसनीय अशी कल्पना मांडली. मध्ये पूर्णतः न खोदता व दोन्ही बाजूंचे समुद्र म्हणजेच पॅसिफिक आणि अटलांटिक समुद्र एकमेकांना न जोडता आपण जहाजे वर उचलून डोंगरावर नेऊ तेथे एक सरोवर बनवू आणि थोडा कालवा खणून दुसऱ्या टोकापर्यंत जहाजे पाण्यातून नेऊ आणि पुन्हा जहाजे खाली उतरवून त्यांना समुद्रात सोडू. हे ऐकून त्यावेळी नक्कीच या इंजिनीअर ला वेड्यात काढले असणार यात शंका नाही. पण त्यांनी ही कल्पना जेंव्हा कागदावर मांडली तेंव्हा मात्र भल्याभल्यानी तोंडात बोटं घातली. 
मग काम चालू झाले या वेळीही त्या जंगलातील विशिष्ट डासांमुळे पुन्हा कामगार रोगराईने त्रस्त होत होते पण तोपर्यंत कांही औषध तयार झाली होती, पण म्हणून मनुष्यहानी जरी कमी झाली असली तरी बंद झाली नव्हती. अफाट असे मनुष्यबळ वापरात येत होते ज्यावेळी या कामाचा अत्युच वेग होता त्यावेळी कमाल 40000 लोक कामावर होते.

 1914 ला काम पूर्ण होईपर्यंत एकूण 56000 कामगार कामावर होते त्यापैकी जवळपास 5500 लोक हे रोगराई आणि इतर अपघात यात कामावर असताना मरुन पडले.

        आता थोडं काम कसे झाले हे पाहू...

या डोंगर माथ्यावर कांही नद्या वळवून आणि कुठं खोदकाम तर कुठं भराव टाकुन पूर्णतः मानव निर्मित असा सरोवर बनवण्यात आला. तो सध्या जवळपास 164 चौरस मैल इतका अफाट पसरलेला आहे. 
आता पुढील गम्मत म्हणजे त्या सरोवरातील पाण्याची उंची ही पॅसिफिक आणि अटलांटिक समुद्र सपाटीपेक्षा 26 मीटर म्हणजेच 85 फूटानी जास्ती आहे. आणि याच उंचीवर प्रत्येक जहाज हे उचलून नेले जाते आणि दुसऱ्या टोकावर पोचल्या वर पुन्हा खाली उतरले जाते.

          जहाज  85 फूट उचलले जाते ते कसे



या 26 मीटरच्या (85 फूट)उंचीत एकूण तीन टप्पे केले आहेत आणि त्या प्रत्येक टप्प्यात जहाज नेऊन पुढील टप्प्याच्या उंचीनुसार पाणी वाढवले जाते आणि मग ते पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हे एकत्र जोडले जातात. त्यानंतर हा दुसरा  टप्पा जहाजाच्या मागील बाजूपासून विद्युत नियंत्रित लॉक गेट टाकून वेगळा केला जातो आणि पुन्हा या दुसऱ्या टप्प्यातील पाण्याची उंची त्यापुढील तिसऱ्या टप्प्यापर्यंत वाढवून पुन्हा हा दुसरा टप्पा आणि पुढील तिसरा टप्पा एकत्र जोडले जातात आणि मग तिसऱ्या टप्प्यात जहाज नेले जाते. आता शेवटचा टप्पा म्हणजे गुटन सरोवर च्या पाण्याची उंची अगदी अश्याच प्रकारे गाठली जाते आणि शेवटचे लॉक गेट उघडुन मग जहाज हे सरोवरात पोचते.

हा मानवनिर्मित गुटन सरोवर आणि कांही खोदलेला कॅनॉल चा भाग असे एकूण 82 किलोमीटर चे अंतर हे 8 ते 10 तासात क्रॉस केले जाते. यासाठी भरमसाठ फी आकारली जाते. इथंही जहाज हे पूर्णतः पनामा औथोरिटी च्या नियंत्रणात असते.

आणि दुसऱ्या टोकावर जहाज पोचल्यानंतर अगदी असेच पण उलट्या क्रमाने जहाज तीन टप्प्यात उतरवले जाते.


ही सर्व प्रक्रिया सोबत असणाऱ्या व्हिडीओ मध्ये अगदी सविस्तर दाखवण्यात आली आहे.

हा कॅनॉल बांधण्यासाठी त्याकाळी 350 मिलियन अमेरिकेन डॉलर म्हणजेच 35 कोटी डॉलर खर्च आला होता. (आताच्या हिशोबाने जवळपास  2500 करोड भारतीय रुपये).

या कॅनॉल मधून जाणारी जहाजे अगदी सुएझ सारखीच चेक केली जातात आणि जे त्यांच्या मापदंडात बसतात त्यांनाच इथून क्रॉस करण्याची परवानगी दिली जाते.

वर्षाला जवळपास सरासरी 14000 जहाजे इथून क्रॉस होतात.

अखंड पृथ्वीवर मानवनिर्मित असे हे सुएझ आणि पनामा हे दोनच महान असे कॅनॉल आहेत.

1914 पासून 1979 पर्यंत हा कॅनॉल पूर्णतः अमेरिका सरकारच्या ताब्यात होता त्यानंतर 1999 पर्यंत मग पनामा  प्रजासत्ताक आणि अमेरिका हे दोघे मिळून कारभार पाहू लागले तर 1999 नंतर मात्र हा कॅनॉल पूर्णपणे पनामा प्रजासत्ताक च्या ताब्यात आहे.

हा कॅनॉल म्हणजे अफाट विचारशक्ती आणि त्या विचारांना दिलेली त्यावेळच्या टेक्नॉंलॉजीची जोड याचे अतिउत्तम असे उदाहरण आहे.

.  पनामा कालवा (स्पॅनिश: Canal de Panamá) हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो. इ.स. १९१४ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती. २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.
पनामा_कॅनॉल_माहिती;
समुद्री सपाटी पासून उंची 85 फूट (26मीटर)
एकूण लॉक गेट 12
लॉक गेटची रुंदी 6.5 फूट तर लांबी 110 फूट
कॅनॉल ची लांबी एकूण 82 किलोमीटर
क्रॉस करण्यास लागणारा वेळ 8 ते 10 तास
वाचलेले अंतर 2000 ते 15000 किलोमीटर
दोन्ही बाजूने जहाजे एकाच वेळी ये जा करू शकतात.

           लेखक ..
नेहमीच जिज्ञासू असणारा
    बापा - बाळासाहेब पाटोळे
     इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर
          टोकियो जपान.

 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई