RAYGAD: घराघरांतून परस्परांशी संवाद वाढवणे गरजेचे:- ॲड. निळा तुळपुळे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

RAYGAD: घराघरांतून परस्परांशी संवाद वाढवणे गरजेचे:- ॲड. निळा तुळपुळे




घराघरांतून परस्परांशी संवाद वाढवणे गरजेचे:- ॲड. निळा तुळपुळे

लोकसंदेश रायगड प्रतिनिधी (श्याम लोखंडे )

एकत्रकुटुंब पद्धतीवरून आपण विभक्त कुटुंब पद्धती स्विकारल्याने घराघरातून संवाद थांबला असल्याने अपयशाला सामोरे जाताना आवश्यक ते मार्गदर्शन वा आधार मिळत नाही. युवा पिढीचा आत्मविश्वास कमी झाल्याने निराशेच्या क्षणी आत्महत्येचे प्रयत्न केले जातात अथवा व्यसनाधिनतेकडे वळतात. यासाठी घराघरातून परस्परांशी संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ व समुपदेशक ॲड.नीला तुळपुळे यांनी डाॅ नानासाहेब धर्माधिकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे व्यक्त केले.
लायन्स क्लब रोहा व लायन्स क्लब कोलाड रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अपयशाला सामोरे कसे जाल?' या विषयावर मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विधिज्ञ व समुपदेशक ॲड. नीला तुळपुळे बोलत होत्या. कला विभाग प्रमुख प्रा. सतीश सावळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लब रोहा चे खजिनदार पराग फुकणे, लायन्स क्लब कोलाड रोहा चे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, खजिनदार डाॅ श्याम लोखंडे, संचालक अनिल महाडिक उपस्थित होते.



नकार स्वीकारण्याची मानसिकता तयार होण्यासाठी लहानपणीच मुलांना काही गोष्टी नाकारण्याची जबाबदारी पालकांची आहे. प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात मागील पिढी कमी पडल्याने नव्या पिढीला स्वतःच पाहिलेले आभासी जगातील गोष्टी आदर्श वाटत असल्याची खंत नीला तुळपुळे यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. सतीश सावळे यांनी क्षेपणास्त्र बनवताना आलेल्या अपयशामुळे डाॅ अब्दुल कलाम यांनी क्षेपणास्त्र बनवणे सोडून दिले असते तर आज भारत सामर्थ्यशाली झाला नसता असे स्पष्ट करून आजच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवीन उर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
रविंद्र लोखंडे यांनी अपयशातून आपल्याला चुका सुधारण्यासाठी संधी मिळत असल्याचे सांगून अपयशी माणसांनीही इतिहास घडवल्याची उदाहरणे सांगितली.
अनिल महाडिक यांनी अपयशानंतर परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून त्रुटी शोधून त्या दूर केल्या तर भविष्यात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास बळावत असल्याचे सांगितले.
पराग फुकणे यांनी अॅड नीला तुळपुळे यांचा परिचय करून दिला व समाजात विशेषतः रोहा व परिसरातल्या नजिकच्या काळात घडलेल्या आत्महत्येच्या घटना लक्षात घेत लायन्स क्लब च्या वतीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या वतीने बोलताना अमिषा बारसकर हिने सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले तर स्वराज सकपाळ याने नकारात्मक परिस्थितीची कारणमीमांसा करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिक्षा सिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सूर्यकांत अमलापुरे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली