लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी नागपूर
नागपूरकरांचे पिण्याचे पाणी प्रदूषित, शेतजमीन नापीक होणार; खासाळा राख तलाव फुटीचा परिणाम राहणार पुढच्या अनेक वर्षांपर्यंत....
कोराडी वीज प्रकल्पातील खासाळा राख तलावाचा बांध फुटल्याने आता नागपूरला प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पामध्ये लाखो टन राख साठवण्यात आली होती, ती वाहून गेल्याने आता नागपुरातील नदी, नाले, नळयोजनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पुढच्या काही काळापर्यंत या परिसरातील शेतजमीन नापीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा कोसळून यातील राख सर्वदूर वाहून गेली आहे. नागपुरातील वेगवेगळ्या पाणवठ्यामध्ये तसेच इतर जलस्त्रोतामध्ये ही राख मिसळण्याची शक्यता असल्याने नागपूरकरांना आता प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. ज्या शेतांमध्ये ही राख पाण्यावाटे पसरली आहे, ती जमीन आता नापीक होण्याची शक्यता आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी या ठिकाणी भेट दिली. नळ योजनेला याचा मोठा धोका असून अनेक नाले उथळ होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नागपूर शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राखयुक्त पाणी सगळीकडे वाहत आहे. नागपूरच्या सर्व ठिकाणी पाण्यात राखच दिसून येत असून अनेक कि मी.पर्यंत ही राख असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या राखेचा परिणाम पुढचे अनेक वर्षे नागपूरकरांना भोगावं लागणार असं दिसतंय.
शनिवारी कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा कोसळल्याची घटना घडली आहे. ही राख पाण्यासोबत वाहून गेल्याने अनेक किलोमीटरपर्यंत या राख पोहोचली आहे. खसाळा, म्हसळा, कवठा, खैरी आदींसह परिसरातील गावांमध्ये फ्लाय राखेचे पाणी वाहत आहे. या तलावाची गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई