संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पाऊस व पुराच्या परिस्थितीची बातमी एका क्लिकवर .. पहा लोकसंदेश न्यूज....
पावसाचं आज ही धुमशान !! आज राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन ..
राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. आताच्या माहितीनुसार ताज्या रडार आणि सॅटेलाइट ऑब्सनुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील 2/ 3 तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे
पालघरमध्ये दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी
भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिले आहे.
पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पीक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन
वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14 जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत सरासरी 375 मिमि म्हणजे 42.9 टक्के (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमानाच्या) पर्जन्यमान झालेलं आहे. वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा धरण 11 जुलै रोजी 60.36 टक्के भरलेले असून, सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने येत्या 72 तासांत येणाऱ्या येव्या नुसार पुराचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदी पात्र ओलांडू नये. निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आले असून, त्यामधून 178.73 (घन.मी./से) पाण्याचा विसर्ग सूरु असल्याने वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट
मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे.
मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट
मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा अद्याप मुंबई लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. लोकल सेवा सुरळीत सुरु आहे.
बारामती परिसरात दमदार पाऊस
इंदापूर शहरासह तालुक्यामध्येही हलक्या व मध्यम स्वरूपात पावसानं हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र मागच्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. मुळशी, खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने उजनी धरणात देखील साडेपाच टीएमसी पाणी साठले आहे.
यवतमाळमध्ये संततधारा सुरू, अर्णी शहरात पाणी शिरले
यवतमाळमधील उमरखेड तालुक्यात काल संध्याकाळपासून सतंतधार पाऊस सुरू आहे. पुसद दहागाव जवळील पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आल्याने रास्ता बंद करण्यात आला आहे. मागील वर्षी याच पुलावर बस पाण्यात पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. शासनाने नवीन पूल बांधला पण त्याबाजूने रस्त्यावर पाणीच पाणी आहे. उमरखेड ढाणकी झाडगाव उजाड जवळ असलेल्या नाल्यास पाणी आल्याने हा रस्ताही बंद करण्यात आला.
दोन दिवसापासून आर्णी शहरात जोरदार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. मध्यरात्री पासून पावसाचा चांगलाच जोर वाढल्याने शहरातील अरूनावती नदी दोन्ही थड्या भरून वाहत आहे. अशातच या नदीचा प्रवाहाचे पाणी नाल्यात आल्याने नाल्यांना पूर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले.
सांगली/ कराड कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास सुरुवात...
संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढू लागली आहे. कृष्णेची पाण्याची पातळी आज सकाळी 18 फुटापर्यंत गेलेली दिसून आली. अद्याप कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू नसला, तरी देखील केवळ नदीच्या पात्रात पडणाऱ्या पावसाने ही पाणीपातळी वाढली आहे. दुसरीकडे मागील आठवड्याभरापासून चांदोली धरण परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 50 टक्के भरले आहे.
लोणावळ्यात उच्चांकी पाऊस
लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला. इथं गेल्या चोवीस तासात 220 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत 1522 मिलिमिटर पाऊस बरसलाय. त्यापैकी गेल्या सहा दिवसातंच 952 मिलिमिटर पावसाने हजेरी लावली आहे. लोणावळा परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागलेत.
रत्नागिरीमध्ये पावसाची उसंत
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसानं जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार बॅटिंग केली. पण सध्या मात्र पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत होती. या नदीची इशारा पातळी पाच मीटर असून धोका पातळी सात मीटर इतकी आहे. पण सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. पण असं असलं तरी हवामान विभागांना दिलेला पावसाचा इशारा पाहता नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क आहे. सध्या जिल्ह्यामध्ये NDRF च्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
परभणीत सलग पाचव्या दिवशी संततधारा
परभणीत सलग 5 व्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. येलदरीत 2.14 टक्के तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र मागच्या सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसतोय. यामुळे पीक चांगली बहरली असून प्रकल्पातील पाणी साठ्यात ही चांगली वाढ झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना हवा असलेला मूर पाऊस यंदा पडतोय. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत आहे. तसेच येलदरी आणि लोअर दूधना प्रकल्प क्षेत्रात ही चांगला पाऊस होत असल्याने येलदरीत 2.14 टक्के एवढा पाणी साठा वाढलाय तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.
औरंगाबादसह जालना जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट
मराठवाड्यात 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम असणार असून, आज औरंगाबादसह जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत दोन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात जोरदार पावसाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेत उपाययोजना केल्या जात आहे.
लोकसंदेश न्यूज मीडियाकडून नम्र आवाहन...
सर्व प्रवासी व वाहनधारकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की,... संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे, जागोजागी डोंगर, नदी नाले, दर्या, याच्यातून घाट पडण्याचे प्रकार होत आहेत... तरी आपण आपली वाहने व प्रवास पावसाची व पूर परिस्थिती पाहूनच चालवावित .. अन्यथा आपलं वाहन व आपण जोखीम मध्ये येऊन आपण व आपले कुटुंबीय अडचणीत येऊ शकते, धन्यवाद....
संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.
सौजन्य..
www.caroldpart.com
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई