DELHI
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एन डी.ए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला ...
मुर्मू यांनी विरोधकांचे उमेदवार असलेल्या यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मतं तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं मिळाली.
भारताच्या विविधतेत एकतेचं दर्शन आजच्या निवडणुकीतून झालं .. कारण देशात पहिल्यांदाच एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदावर विराजमान झाली आहे.
द्रौपदी मुर्मू २४ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.
एनडीएनं राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिलेचा चेहरा देत धक्कातंत्र आजमावलं होतं. देशातील आदिवासी समाजाचा सन्मान म्हणून विरोधकांमधील काही पक्षांनीही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली असं म्हणता येईल.
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मुर्मू यांनी आघाडी घेतली होती ती अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यापर्यंत कायम राखली. पहिल्या टप्प्यात मुर्मू यांना ५४० मतं मिळाली होती. या मताचे मूल्य ३,७८,००० इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचं मूल्य १,४५,००० इतकं होतं. दुसऱ्या फेरीत मुर्मू यांना १३४९ मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मतं मिळाली.
तिसऱ्या फेरीत विजयावर शिक्कामोर्तब करत मुर्मू यांची विजयाची आघाडी एकूण ८१२ मतांपर्यंत पोहोचली. तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं पडली. तिन्ही फेरीत एकूण मिळून द्रौपदी मुर्मू यांना २१६१ मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना १०५८ मतं मिळाली.
मुर्मू यांच्या विजयानंतर भाजप कडून देशभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दिल्लीत विजय रॅली काढली जाणार आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार विजयी झाल्यानंतर रॅली काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. दिल्लीतील रॅलीचं नेतृत्व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा करणार असून यावेळी ते भाषणही करणार आहेत. यावेळी तब्बल २० हजार लाडूंचं वाटप केलं जाणार आहेत.
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. मुर्मू या ओदिशा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. तर, दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. यूपीएच्या काळात काँग्रेसनं प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाव संधी दिली होती.
द्रौपदी मुर्मू या ओदिशा राज्यातील आहेत. झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओदिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाच प्रतिनिधीत्त्व करतात.
सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ ते २०१५ मध्ये काम केलं आहे.
द्रौपदी मुर्मू यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. रायरंगपूरच्या उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं.
आदिवासी समाजाला एक उच्च पद मिळाल्याने मुर्मू यांच्या गावात व संपूर्ण भारतातील आदिवासी समाज आज आनंदोत्सव साजरा करत आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई