शिवपुरी ते बाहुबली दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था..
KOLHAPUR
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी.विनोद शिंगे
शिवपुरी - बाहुबली रस्ता बनला धोकादायक ; प्रवासी, भाविक व विद्यार्थ्यांची दुरुस्तीची मागणी.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, नेज, शिवपुरी, बाहुबली, नरंदे आदी गावांना जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या शिवपुरी ते बाहुबली या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्याचबरोबर कुंभोज व नरंदे फाट्याकडून बाहुबलीला येणाऱ्या रस्त्याची देखील प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी वळणे व घनदाट झाडी आहे. त्यामुळे भरधाव वाहन धारकाचा वाहनावरील ताबा राहत नाही त्यामुळे अपघात घडत आहे तसेच वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
कुंभोज, नेज ,शिवपुरी ,बाहुबली, दुर्गेवाडी, हिंगणगाव , नरंदे या परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने बाहुबली विद्यापीठाचे एम जी शहा विद्यामंदिर शाळेला या मार्गे जात असतात. तसेच नेज ,शिवपुरी, कुंभोज ,नरंदे ,बाहुबली ,हिंगणगाव, दानोळी या गावातून शेकडो नोकरदार याच रस्त्याने रोज प्रवास करत असतात. या भागात लक्ष्मी इंडस्ट्री, पार्वती इंडस्ट्री, इचलकरंजी येथील सुत गिरण्यां मध्ये नोकरी करणार्या नोकरदारांना शिफ्ट नुसार वेळी अवेळी खड्ड्यातून वाट काढावी लागते. या रस्त्यावर सतत छोटे मोठे अपघात होत असतात. शिवाय खड्ड्यामधून प्रवास केल्याने अनेक नागरिकांना शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. याच वाटेवर विविध प्रकारचे कारखाने असल्याने अवजड वाहने देखील धावत असतात. गेल्या कित्येक वर्षात या रस्त्यावर केवळ पॅचवर्कच केले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली