सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात बिज प्रक्रिया रथ फिरविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आजअखेर कृषी विभागामार्फत ३ हजार ७९० प्रात्यक्षिके घेऊन बिज प्रक्रिया कशी करावी हे दाखविण्यात आले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच बियाणे पेरावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी केले आहे.
कृषी विद्यापीठामार्फत तयार करण्यात आलेल्या पी.एस.बी. व रायझोबियम या जैविक खतांचा वापर, तसेच ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर, किडनाशक थायोमिथॉक्झाम वापर केल्याने पेरणी पासून तीस दिवस पिकाचे किड व रोगांपासून संरक्षण होते. १०० टक्के बियाणे प्रक्रिया करुनच बियाणे पेरणी करणाऱ्या गावांसाठी कृषी विभागाने बक्षीस योजना देखील घोषीत केली आहे. या मोहिमेअंतर्गत बीजप्रक्रिया साहित्य व बीज प्रक्रिया ड्रम घेऊन कृषी कर्मचारी गावागावात भेट देतील व बियाणे प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. एकरी फक्त 200 ते 250 रुपयांत आपण आपल्या पिकांच्या वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत पिक संरक्षण करु शकतो. अत्यंत कमी खर्चाचे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फारच फायदेशीर ठरत असल्याचे श्री. वेताळ यांनी सांगितले.
00000