सांगली जिल्ह्यात विविध उपक्रमाद्वारे कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार ... जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ
शेतकऱ्यांनी कृषि संजिवनी सप्ताहात सहभागी होवून विविध पिकांचे तंत्रज्ञान आत्मसात करावे
सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि विभाग आणि कृषि विद्यापीठातील अधिकारी आणि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधण्यासाठी जिल्ह्यात दि. 25 जुन ते 1 जुलै 2022 "कृषि संजीवनी सप्ताह" साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेता त्यांच्या 1 जुलै जयंती दिनानिमित्त कृषि दिन साजरा करुन कृषि संजिवनी सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि संजिवनी सप्ताहात सहभागी होवून विविध पिकांचे तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी केले आहे.
या कार्यक्रमात 25 जून 2022 रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मुल्यसाखळी बळकटीकरण दिन आयोजीत करण्यात येणार असून या दरम्यान बिजप्रक्रिया मोहीम गावा-गावात बिजप्रक्रिया रथ फिरवून समुह बिजप्रक्रिया करुन दिली जाणार आहे. तसेच बियाणे वितरण, मिनीकिट वितरण केले जाणार आहे. 26 जून रोजी पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात येणार असून पौष्टिक तृणधान्य पिकांचे प्रक्रिया मुल्यवर्धन तसेच प्रक्रिया केंद्राना प्रत्यक्ष भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे.
पौष्टीक तृण धान्याचे आहारात असणारे अनन्य साधारण महत्वा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 27 जुन 2022 रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमिकरण दिवस जिल्हास्तरावर साजरा करण्यात येणार असून
या कार्यक्रमांतर्गत पिकतंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला चर्चासत्र व परिसंवाद तसेच महिलांना वापरण्यायोग्य शेतीतील यंत्र सामुग्री याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 28 जून 2022 खत बचत दिन, 29 जून 2022 प्रगतशिल शेतकरी संवाद दिवस, 30 जून 2022 शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे श्री. वेताळ यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली, मुंबई