सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांमध्ये सोलरचा जास्तीत जास्त वापर होणे गरजेचे आहे. खानापूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजना 100 टक्के पूर्ण करणार असल्याचे सांगून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचा टेम्भू वाले बाबा असा गौरवपूर्ण उल्लेख केला.
खानापूर तालुक्यातील नागेवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, सरपंच सतिश निकम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नागेवाडी गावाचे नागनाथनगर असे नामकरण सोहळा व राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नागनाथनगर जलशुद्धीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा तसेच 3 कोटी 50 लाखाच्या विविध विकास कामाचे उदघाटन आणि लोकार्पण सोहळा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पार पडला.
आमदार अनिल बाबर म्हणाले, मी लोकांची सेवा करणारा असून मतदारसंघात जे मी काम केले आहे ते लोकांच्या हृदयातून पुसू शकणार नाही. मला कायम जनतेत राहून लोकांची कामे करायची आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये मंजूर योजना पूर्ण करण्यात आली असून ही योना सद्या कार्यान्वीत आहे. या याजनेंतर्गत पंप, पंपगृह, दाबनलिका, जलशुध्दीकरण केंद्र व मर्यादित वितरण व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेसाठी अस्तित्वातील 1 लाख लिटर क्षमतेचा उंच जलकुंभ वापरात आणलेला आहे. गावाची एकूण कुटुंब संख्या 956 असून या कुटूंबापैकी 806 कुटूंबाना या योजनेंतर्गत नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
00000