बाळू भोकरेसह तीन टोळ्या तडीपार__
पोलीस अधीक्षकांची कारवाई : सांगली, कुपवाडच्या सराईत गुन्हेगारांना दणका.
SANGLI
लोकसंदेश न्यूज सांगली प्रतिनिधी.
सांगली : सांगली शहर, विश्रामबाग व हद्दीतील तीन टोळ्या जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश मंगळवारी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले. यात सराईत गुंड महेंद्र ऊर्फ बाळू भोकरे (वय ४५, रा. गणेशनगर) टोळीचाही समावेश आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळू भोकरे, त्याचा साथीदार अक्षय ब्रह्मानंद दुग्गे (२७, शिकलगार गल्ली, खणभाग), धीरज बाबासाहेब कोळेकर (२५), अक्षय माणिक शिंदे (२५, दोघे रा. गणेशनगर)
या टोळीला सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. टोळीवर खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रांनी दुखापत, मारहाण, दमदाटी,विनयभंग, अपहरण आदी गुन्हे आहेत.
विश्रामबाग हद्दीतील अय्याज शेख टोळीचा प्रमुख अय्याज शकील शेख (२५, श्यामरावनगर), अक्षय जयवंत निकम (२३, मुसळे प्लॉट), सुशांत सावंत शेडंबाळे (२०, हनुमाननगर) या तिघांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले.
या टोळीविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, लूटमार, मारहाण, शिवीगाळ, स्त्रियांचा लैंगिक छळ असे नऊ गुन्हे दाखल आहेत.
कुपवाड हद्दीतील मनोज अशोक रूपनर टोळीलाही सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून वर्षासाठी तडीपार करण्यात आले. टोळीप्रमुख रूपनर(२४, रा. श्रीमंत कॉलनी), गणेश विजय डोईफोडे (२४, शिवनेरीनगर), सुशांत महादेव जोडरट्टी (२७), अनिकेत उत्तम वायदंडे (३२, दोघे रा. कापसे प्लॉट) या चौघांवर कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, जबरी चोरी, विनयभंग असे १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अजय सिंदकर, विश्रामबागचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, शहरचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे निरीक्षक अविनाश पाटील, सहाय्यक फौजदार सिद्धाप्पा रुपनर, संजय पाटील, दीपक गट्टे, राजेंद्र नलावडे, सतीश माने यांनी भाग घेतला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई
सांगली