विंग कमांडर अभिनंदन वर्धमान वीर चक्र पुरस्काराने सन्मानित
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आज वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. विंग कमांडर अभिनंदन यांनी भारताच्या हद्दीत घुसखाेरी करणारे पाकिस्तानचे एफ-16 हे विमान पाडले होते.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने २६-२७ फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानात लपून बसलेले ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते .
वाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या वायुसेनेने भारतात घुसखाेरी करण्याचा प्रयत्न केला होता; पण भारतीय वायुसेनेनं तो प्रयत्न हाणून पाडला. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-21 या विमानाने पाकिस्तानचे एफ-16 हे विमान पाडले होते. यानंतर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. यावेळी पाकिस्तानच्या सैनिकांनी अभिनंदन यांना अटक केली होती. भारताने दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने सुमारे ६० तासांनंतर अभिनंदनला सोडले होते.
अभिनंदन यांनी मिग-21 वरून F-16 पाडले होते. त्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले होते. F-16 हे अत्यंत प्रगत लढाऊ विमान होते, जे अमेरिकेची निर्मिती होती. मिग-21 हे 60 वर्ष जुने रशियन बनावटीचे विमान होते. भारताने १९७० च्या दशकात रशियाकडून मिग-21 खरेदी केले होते.